१. संगणक साक्षर नसलेल्या व्यक्ती ‘महालाभार्थी’ पोर्टलवर नोंदणी कशा प्रकारे करतील?
उत्तर: संगणक साक्षर नसलेल्या व्यक्ती सेवा घेण्यासाठी, जवळच्या एमकेसीएल MS-CIT केंद्राला भेट देऊ शकतात. सोमवार ते शनिवार स.०९.३० – सायं.०५.३० (२ रा आणि ४ था शनिवार वगळता) आपल्या सेवेसाठी ते तत्पर असतील.
२. ‘महालाभार्थी’ पोर्टलसाठी मला किती शुल्क देणे आवश्यक आहे?
उत्तर: पोर्टलची सेवा ही पूर्णत: मोफत आहे. आपण स्वत:च संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करू शकता. आपण संगणक साक्षर नसल्यास संगणक प्रशिक्षित व्यक्तींच्या मदतीने ही सेवा घेऊ शकता. संबंधित प्रशिक्षित व्यक्ती आपल्याला सेवा देण्यासाठी स्वत:चा बहुमूल्य वेळ देईल तसेच संगणक आणि इंटरनेट चा खर्च करेल. त्यासाठी आपण त्याला जास्तीत जास्त ₹७०/- देवू शकता. यामध्ये त्या व्यक्तीने नागरिकांची नोंदणी करणे, त्यांची संपूर्ण माहिती वेबपोर्टल वर भरणे, भरलेल्या माहितीवरून मिळणाऱ्या संक्षिप्त माहितीचे प्रिंट-आउट काढून देणे अपेक्षित आहे. ज्या ज्या वेळी आपण संगणक प्रशिक्षित व्यक्तींकडून ही सेवा घ्याल, त्या त्या वेळी आपण त्यांना हे सेवाशुल्क देवू शकता. याव्यतिरिक्त जर आपणास इतर प्रिंट-आउटस हव्या असतील जसे की, शासकीय निर्णय, विहित नमुना अर्ज इत्यादी तर संबंधित व्यक्तीला आपण प्रती प्रिंट ₹ १/- ते ₹ ५/- देवू शकता.
३. मी नोंदणीच्या वेळी दिलेली माहिती बदलू शकतो / शकणार का?
उत्तर: आपण नोंदणीच्या वेळी भरलेली माहिती बदलू शकणार नाही. त्यामुळे नोंदणी करताना आपली माहिती आपण काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. परंतु लॉगीन केल्यावर भरलेली माहिती आपण बदलू शकता.
४. मी पूर्ण तपशील कसा भरू शकतो / शकते आणि मी तो का भरावा?
उत्तर:
'महालाभार्थी' मध्ये पूर्ण तपशील भरण्यासाठी खालील नमूद विविध भागांमध्ये आपण माहिती भरू शकता:
१. वैयक्तिक माहिती
२. सामाजिक माहिती
३. संपर्क माहिती
४. कायमस्वरूपी निवासी पत्ता
५. सध्याचा निवासी पत्ता
६. शारीरिक आणि आरोग्यविषयक माहिती
७. इतर ओळखीची माहिती
८. कौटुंबिक माहिती
९. बँक खाते माहिती
१०. प्राप्त पुरस्कार माहिती
११. घरासंबंधी माहिती
१२. विमा माहिती
१३. रोजगार माहिती
१४. शेतीविषयक माहिती
१५. पशुधनविषयक माहिती
१६.बँक कर्जाबाबतची माहिती
वरील प्रकारे आपली संपूर्ण माहिती वेबपोर्टल मध्ये आल्यास आपली विविध योजनांसाठी ची संभाव्य पात्रता जलद गतीने पडताळून पाहता येईल. आपल्या भरलेल्या माहितीच्या आधारे, आपण संभाव्य पात्र ठरू शकणाऱ्या नवीन योजनांबाबत / विविध लाभांबाबत आपल्याला योग्य तो संदेश पाठवून कळविण्यास सोपे जाईल. आपल्याला वेळीच योजनांसाठीची पात्रता समजल्याने संबंधित योजनेचा लाभ तत्परतेने घेता येऊ शकेल.
५. मला ‘महालाभार्थी’ पोर्टलवर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काय मिळेल?
उत्तर:आपण स्वत: ज्या शासकीय योजनांना पात्र ठरू शकता त्याची व्यक्तिअनुरुप स्वरूपातील सविस्तर माहिती मिळेल, जी खालील प्रमाणे असेल:
१. आपण पात्र होऊ शकणाऱ्या योजनांची यादी
२. संबंधित योजनांमध्ये मिळू शकणारे लाभ
३. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
४. अर्ज स्विकृती कार्यालय / अधिकारी संपर्क
५. योजनांसंबंधित उपलब्ध शासन निर्णय (जीआर) उपलब्ध असल्यास
६. विहित नमुना अर्ज उपलब्ध असल्यास
७. योजनांची यादी, मिळू शकणारे लाभ, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि त्याकरिता कोणाला भेटावे याची थोडक्यात माहिती देणारे प्रिंट-आउट. या प्रिंट-आउटचे महत्वाचे वैशिष्ट्य असे की, यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांचे नागरिकाच्या नावाचा उल्लेख असलेले एक पत्र दिलेले आहे. नागरिक संभाव्य पात्र असलेल्या योजनांसाठी जेव्हा शासकीय विभागांना अर्ज करतील, तेव्हा ते माननीय मुख्यमंत्री यांचे हे पत्र सोबत जोडू शकतात. याला एक संदर्भ क्रमांक दिलेला असून त्याच्या सहाय्याने आपल्याला संबंधित योजनांचे त्या त्या विभागांकडून लाभ मिळविण्यात काही अडचण आल्यास पाठपुरावा करण्यास मदत होईल.
८. संभाव्य पात्र ठरलेल्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा : वेबपोर्टल स्वत: नागरिकांचा विहित नमुन्यातील अर्ज भरून देईल. अर्जाच्या विहित नमुन्यामध्ये आवश्यक असलेल्या ज्या माहितीची नोंद वेबपोर्टलवर नाही ती माहिती नागरिक तेथेच ऑनलाईन भरतील. अशा रीतीने नागरिकांचा विहित नमुन्यातील भरलेला अर्ज संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे जमा होईल. अर्ज केल्यानंतर नागरिकांना संबंधित योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे वेबपोर्टलवरच अपलोड करण्याची सोय केलेली आहे. यामुळे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना नागरिकांना योजनेचे लाभ मिळवून देणे सोपे जाईल. सध्या ज्या योजनांसाठी विहित नमुना अर्ज उपलब्ध आहे अशा निवडक योजनांसाठी प्रायोगिक तत्वावर ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या योजनांसाठी स्वतंत्र वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो अशा योजनांसाठी ‘अर्ज करा’ वर क्लिक केल्यास आपणास संबंधित वेबसाईटशी जोडून दिले जाईल.
६. ‘महालाभार्थी’ पोर्टल विषयी अजून काय महत्वाचे आहे जे मी समजून घेणे आवश्यक आहे?
उत्तर:
१. नागरिकांनी भरलेल्या माहितीवरून विविध शासकीय योजनासाठी त्यांची केवळ संभाव्य पात्रता पडताळून पाहिली जाते. नागरिकांची संबंधित योजनांसाठीची अंतिम पात्रता ठरविणे हा सर्वस्वी संबंधित शासकीय विभागांचा निर्णय आहे.
२. कोणतीही पूर्वसूचना न देता योजना निधीअभावी किंवा इतर कारणास्तव बंद होऊ शकतात, त्यांचे पात्रता निकष, तपशील इत्यादी माहितीमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात या सर्व बदलांसाठी एमकेसीएल जबाबदार असणार नाही. परंतु हे सर्व बदल वेळोवेळी पोर्टलवर अद्ययावत कसे राहतील याविषयी एमकेसीएल सतत जागरूक आणि प्रयत्नशील असेल.
३. सदर वेबपोर्टल वरील माहितीचे स्त्रोत हे महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्या विविध विभागांची संकेतस्थळे आणि वेळोवेळी घेतले गेलेले शासकीय निर्णय (जीआर) हे आहेत. या पोर्टलवर सध्या केवळ योजनांविषयीची माहिती उपलब्ध आहे. ज्याचा सेवा हमी कायद्याशी संबंध आहे अशा कुठल्याही प्रकारच्या सेवांविषयी हे पोर्टल संबंधित नाही अथवा त्या सेवा देत नाही. सेवा हमी कायद्या अंतर्गत येणाऱ्या विविध सेवांसाठी नागरिक महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेत स्थळाला भेट देऊ शकतात.
४. कुठलाही नागरिक अंतिम प्रिंट-आउट वर नमूद योजना आपल्याला मिळाल्याच पाहिजे असा आग्रह करू शकत नाही अथवा तसे गृहीत धरू शकत नाही. सदर प्रिंट-आउट मध्ये माननीय मुख्यमंत्री यांचे व्यक्तिअनुरूप स्वरूपातील पत्र देण्यामागचे प्रयोजन संबंधित शासकीय विभागाचे विविध योजनांचे लाभार्थी निश्चित करण्याचे काम सोपे व्हावे असे आहे. त्या पत्रावरून संबंधित विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला योजनेचा लाभ दिलाच पाहिजे असा आग्रह नागरिकांना धरता येणार नाही.
५. ‘महालाभार्थी’ पोर्टलवरील योजनांसाठीची व्यक्तीअनुरूप स्वरूपातील पात्रता जाणून घेण्यासाठी जर नागरिक एखाद्या संगणक साक्षर सुलभकाची मदत घेत असेल तर सुलभक त्यांच्याकडे संगणक सेवाशुल्क मागू शकतात. सुलभक या कामी आपला प्रती नागरिक सरासरी ३० मिनिटे इतका बहुमूल्य वेळ, संगणक, इंटरनेट यासाठी खर्च करीत आहे, त्यामुळे नागरिक त्यांना जास्तीत जास्त रु.७०/- इतकी रक्कम सेवाशुल्कापोटी देऊ शकतात. यामध्ये सुलभकाने नागरिकांना नोंदणी प्रक्रियेसह संगणक सेवा देऊन अंतिम प्रिंट-आउट काढून देणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त नागरिकाला विहित नमुन्यातील अर्ज, शासकीय निर्णय यांच्या प्रिंट-आउटस पाहिजे असल्यास सुलभक त्यांच्याकडून प्रती प्रिंट रु.१/- ते रु.५/- इतके शुल्क घेऊ शकतात.
६. सुलभकाच्या माध्यमातून सेवा घेताना, भरलेला माहिती अर्ज नागरिकांनी परत जाताना आठवणीने सोबत घेवून जावा, कारण त्यावर नागरिकांची व्यक्तिगत माहिती लिहिलेली आहे. सदर अर्जावरील माहितीचा दुरुपयोग झाल्यास ही सुविधा देणाऱ्या कोणासही त्याकरिता जबाबदार धरता येणार नाही.
७. ‘महालाभार्थी’ नागरिक माहिती अर्जावर नमूद सगळीच माहिती वेबपोर्टलवर भरणे आवश्यक असते का?
उत्तर: नागरिक माहिती अर्जावर नमूद सगळी माहिती वेबपोर्टलवर भरलीच पाहिजे असा कुठेही आग्रह नाही. परंतु आपण संपूर्ण माहिती भरल्यास महालाभार्थी वेबपोर्टल आपणास योजनांसाठी संभाव्य पात्रता पडताळून पाहण्यासाठी केवळ आवश्यक असलेलीच मोजकी योजनानिहाय माहिती विचारते. अशा वेळी आपल्याला सुलभक (महालाभार्थी-प्रेरक) म्हणून मदत करणाऱ्या व्यक्तीला आपली माहिती वेबपोर्टलवर भरताना सोपे जावे, आणि कमीत कमी वेळात आपले काम व्हावे या उद्देशाने हा माहिती अर्ज भरून स्वत: जवळ ठेवावा आणि आपले काम झाल्यास जाताना आठवणीने बरोबर घेऊन जावा.
८. ‘महालाभार्थी’ वेबपोर्टलवरून अर्ज केल्यावर मला योजनेचा लाभ कसा मिळेल?
उत्तर: महालाभार्थी वेबपोर्टल हे शासकीय योजनांसाठी आपली केवळ संभाव्य पात्रता पडताळून पाहते. योजनांसाठी आपली अंतिम पात्रता ठरविण्याचे म्हणजेच आपल्याला अंतिम लाभ मिळवून देण्याचे काम हे संपूर्णपणे संबंधित शासकीय विभागाचे आहे. महालाभार्थीच्या माध्यमातून आपण योजनांसाठी अर्ज करण्याची आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून देण्याची व्यवस्था केलेली आहे. यामुळे नागरिकांना योजनांचे लाभ मिळवून देण्याचे संबंधित विभागांचे काम जलद गतीने होणार आहे.
९. 'महालाभार्थी-प्रेरक' ही काय संकल्पना आहे?
उत्तर: बऱ्याच वेळेला असे आढळून येते की, नागरिकांना संगणकावर किंवा स्मार्टफोनवर वेबसाईट वापरता येत नाही. परंतु केवळ त्या कारणासाठी नागरीक महालाभार्थी सेवेपासून वंचित राहू नये म्हणून त्यांच्या मदतीकरिता महालाभार्थी-प्रेरक ही संकल्पना पुढे आली. थोडक्यात डिजिटली निरक्षर असलेल्या नागरिकांना महालाभार्थी सेवा देणारी डिजिटली साक्षर व्यक्ती म्हणजे महालाभार्थी-प्रेरक होय. ज्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान आहे किंवा ज्यांना स्मार्टफोन उत्तमरीत्या वापरता येतो अशी कोणतीही व्यक्ती / युवा हे महालाभार्थी-प्रेरक बनू शकतात
१०. 'महालाभार्थी-प्रेरक' नागरिकांना कशी सेवा देईल?
उत्तर: 'महालाभार्थी-प्रेरक' हा अगोदर स्वत: ची महालाभार्थी-प्रेरक म्हणून नोंदणी करेल. वेबपोर्टलवर ‘महालाभार्थी-प्रेरक लॉगीन’ अशी सुविधा देण्यात आलेली आहे. मग प्रेरक ‘महालाभार्थी-प्रेरक लॉगीन’ मध्ये जाऊन नागरिकांची महालाभार्थी पोर्टलवर नोंदणी करेल. त्यानंतर प्रेरक नागरिकांची आवश्यक ती माहिती पोर्टलवर भरेल. नागरिकांना ते संभाव्य पात्र असलेल्या योजनांची माहिती देणारे माननीय मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीसह संबंधित नागरिकाच्या नावाचा उल्लेख असलेले पत्र मिळवून देईल. आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांना विहिती नमुना अर्ज आणि जीआर यांच्या प्रिंट काढून देईल.
११. ज्या ठिकाणी इंटरनेट व्यवस्थित चालत नाही अशा दुर्गम ठिकाणी 'महालाभार्थी-प्रेरक' काय करेल?
उत्तर: नागरिकांची भेट घेतील आणि त्यांच्याकडून तो माहिती अर्ज व्यवस्थित भरून घेतील. महालाभार्थी सेवा घेण्यासाठी जी माहिती भरावी लागते अशी सर्व माहिती त्या अर्जावर नागरीक भरतील तसेच त्यांना कशाची गरज आहे / काय हवे आहे हे सुद्धा नोंदवतील. नागरिकांकडून अर्ज व्यवस्थित भरून घेतल्यावर महालाभार्थी-प्रेरक हा ज्या ठिकाणी इंटरनेटची उत्तम सुविधा आहे अशा ठिकाणी येऊन संबंधित नागरिकाच्या माहितीची नोंद महालाभार्थी पोर्टलवर करेल. नागरीकाला ज्या लाभांची गरज आहे किंवा तो कोण आहे यानुसार जेवढ्या योजना दिसतील, तेवढ्याच योजनांची पात्रता पाहण्यासाठी, आवश्यक असणारी माहिती प्रेरक भरेल. म्हणजेच अर्जावरील उपलब्ध सगळ्याच माहितीची नोंद करण्याची प्रेरकाला गरज नाही. नागरिकांची नोंदणी करताना तो स्वत:च्या महालाभार्थी-प्रेरक लॉगीनचा वापर करेल. जर प्रेरकाने स्वत:च्या लॉगीनमधून नागरिकांची नोंदणी केली तर त्यावेळी आवश्यक असलेला ओटीपी, पहिल्या सेशनला विचारला जाणार नाही; यामुळे नागरिकांची नोंदणी आणि माहिती भरण्याचे प्रेरकाचे काम सोपे होईल. अर्थात प्रेरकाने पहिल्याच सेशन मध्ये संबंधित नागरिकाची पूर्ण महिती भरून त्याचे पत्र काढून देणे अपेक्षित आहे. काही कारणास्तव पहिल्या सेशनमध्ये संबंधित नागरिकाला महालाभार्थी सेवा देता आली नाही तर पुढच्या सेशनमध्ये नागरिकाची प्रोफाईल एडीट करताना मात्र ओटीपीची आवश्यकता भासेल. त्यामुळे शक्यतो पहिल्याच प्रयत्नात प्रेरक हा नागरिकांना महालाभार्थी सेवा देईल.
१२. जर मी 'महालाभार्थी-प्रेरक' म्हणून काम केले तर मला त्याचा काय फायदा होईल?
उत्तर: 'महालाभार्थी-प्रेरक' हा महालाभार्थी मधील खूप महत्वाचा घटक आहे. प्रेरक बनून तुम्ही नागरिकांना ते संभाव्य पात्र असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि तसेच मा. मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीच्या पत्राची प्रिंट-आउट मिळवून देणार आहात. साहजिकच डिजिटली निरक्षर अनेक नागरीक तुमच्याकडे मदतीसाठी येऊ शकतात. सामाजिक जाणीवेतून अशा सर्वांना मदत करताना तुम्हाला एक वेगळेच समाधान मिळणार आहे. केवळ तेवढेच नव्हे तर यातून आपणास व्यवसायाची एक उत्तम संधी सुद्धा मिळू शकते. कारण महालाभार्थी सेवा देताना तुम्ही संबंधित नागरिकांकडून प्रती नागरीक रु. ७० एवढे सेवाशुल्क घेऊ शकता. यामध्ये आपण त्या नागरिकाची महालाभार्थीवर नोंदणी करणे, लॉगीन करून त्यांची आवश्यक ती माहिती पोर्टलवर भरणे आणि त्यांना मा. मुख्यमंत्री यांचे पत्र काढून देणे अपेक्षित आहे. विहित नमुना अर्ज अथवा जीआर च्या प्रिंटची नागरिकांनी अतिरिक्त मागणी केली तर आपण किमान १ रु ते जास्तीत जास्त ५ रु. पर्यंत प्रती प्रिंट प्रिंटींग शुल्क संबंधित नागरिकांकडून घेऊ शकता. महालाभार्थी पोर्टलवर योजनांची माहिती तसेच नागरिकांची पात्रता ही वेळोवेळी बदलत असते. त्यामुळे ठराविक काळानंतर नागरीक पुन्हा पुन्हा तुमच्याकडे सेवा घेण्यासाठी येऊ शकतात. अशा प्रत्येक सेवेसाठी आपण नागरिकांकडून जास्तीत जास्त ७० रु. पर्यंत सेवाशुल्क घेऊ शकता. त्यामुळे महालाभार्थी-प्रेरक ही अनेक डिजिटल साक्षर अशा बेरोजगार युवांसाठी एक व्यावसायिक सुवर्णसंधी ठरणार आहे. प्रेरकाला आपल्या लॉगीन मध्ये त्याने आजवर किती नागरिकांची पोर्टलवर नोंदणी केली आणि त्यांपैकी किती जणांना प्रत्यक्ष सेवेचा लाभ म्हणजेच मा. मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीच्या पत्राची प्रिंट-आउट मिळवून दिले याचीही नोंद दिसणार आहे.