मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा संदेश
नागरिकांना पात्र ठरू शकणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती व्यक्तिअनुरुप स्वरुपात उपलब्ध व्हावी या उद्देशाने ‘महालाभार्थी’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची केवळ माहिती न देता, नागरिकांनी गरजेनुसार दिलेल्या माहितीवरून ते कुठल्या योजनांना पात्र ठरू शकतात हे दाखविणारे ‘महालाभार्थी’ एक अनोखे संकेतस्थळ आहे.
या संकेतस्थळावर नागरिकांना विविध विभागाच्या योजनांची माहिती मिळेल. योजनेचा उद्देश व मिळणारे लाभ, शासन निर्णय, विहित नमुन्यातील अर्ज, जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, संपर्कासाठी संबंधित अधिकारी अशा अनेक बाबींची माहिती येथे देण्यात आलेली आहे. नागरिक गरजेप्रमाणे, त्यांना हवे असणारे लाभ आणि त्यानुसार योजनांची निवड करतील. त्या योजनांसाठी आवश्यक तेथे माहिती भरून नागरिकांना व्यक्तिगतरीत्या ते त्यातील कोणत्या योजनांना संभाव्य पात्र ठरू शकतात हे दाखविले जाईल. या माहितीमध्ये संबंधित नागरिकाच्या नावाचा उल्लेख असलेले माझ्या स्वाक्षरीचे पत्र मिळेल.
योजनांसाठीची अर्ज प्रक्रियासुद्धा या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन सुरु झालेली आहे.मला आशा आहे की नागरिक या संकेतस्थळाचा जास्तीतजास्त लाभ घेतील.
‘महालाभार्थी’ या वेबपोर्टलची अभिनव संकल्पना योजून त्या सेवेची परिपूर्ण सिद्धता करण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) ने शासनाचे नॉलेज पार्टनर आणि सोल्यूशन आर्किटेक्ट या भूमिकेतून दिलेल्या महत्वपूर्ण व विनामूल्य योगदानाबद्दल मी MKCL प्रती मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
धन्यवाद...
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य